Saturday 19 March 2016

निबंध..


आजोबा रिटायर होताच
आजीनंही जाहीर केलं...
आजपासून ती सुद्धा रिटायर होणार!
सगळेजण अवाक् झाले, म्हणाले
म्हणजे नक्की तू काय करणार?

तुला कुठे होती नोकरी
आठ-दहा तासांची बांधिलकी
रोजची जाण्यायेण्याची धावपळ
आणि वरिष्ठांच्या कटकटी?

खरं आहे रे बाबानो
नव्हती मला नोकरी-बिकरी
नुसती घरातच तर होते मी
बिनपगारी फुल अधिकारी..

तरी आता हवीय मला विश्रांती
त्याच त्या अनमोल बिनमोल कामातून
कंटाळून गेलेय मी अगदी
घाण्याच्या बैलासारखी फिरून फिरून

एक आठवडा झाला जेमतेम
आजीला रिटायर होऊन
अस्ताव्यस्त झालं सगळं घर
प्रत्येकजण गेला वैतागून

केव्हाचा विचार करतोय मी
आजोबा रिटायर झाले, काही नाही बिनसलं
आजी रिटायर झाली मात्र
आणि सगळं कसं विसकटून गेलं?

‘घरकामाचं मोल’ लिहायचा होता निबंध
विषयच कळला नव्हता वर्गामधल्या कुणाला
घरातल्या चित्रानं नीट मला समजावलं
तेच सगळं लिहिलं आणि पहिला नंबर पटकावला..! 
***

No comments:

Post a Comment