Sunday 20 March 2016

ती.. माझी बहीण


ती..
माझी बहीण
खुशाल घाबरू शकते झुरळाला
त्याचं सगळ्यांना कौतुक
आणि मी पोहण्यासाठी
पाण्यात उडी घ्यायला घाबरलो तरी
हसतात सगळी... ऐकावं लागतं मला
घाबरतोस कसला
मुलगा ना तू... !

ती..
माझी बहीण
कुणी जरा जोरात बोललं
तरी लागते मुळु मुळु रडायला
की बाबा लगेच जवळ घेतात
तिच्या रडण्याचंही कौतुक..
आणि मी जोरात आपटलो
तरी रडायचं नाही
मुलगा ना मी..!

मग मी रडू दाबून ठेवतो
मग मला खूप राग येतो
मग मी फेकाफेकी करतो
आरडा ओरडा करतो...
तर सगळी म्हणतात
ती बघ कशी शांत.. शहाणी..
नाहीतर तू..!

तिला सहज मिळेल हवा तिथे प्रवेश
मला मिळवावे लागतील ९९% मार्कस्

मुलगा ना मी..!

***

पूर्वप्रसिद्धी- छात्रप्रबोधन मार्च २०१४ अंक

No comments:

Post a Comment