मुलगी अगदी तहानी, दोन-तीन महिन्यांची असताना आई हेच तिचं जग असतं. हळू हळू मोठी होत ती किशोर
वयाची झाल्यावर, तिचं जग स्वतंत्र झाल्यावर हे नातं कसं पूर्ण बदलतं त्याचा छोटासा आलेख मांडणार्या काही कविता...
इवलीशी मनु
जोरात हलवुन हात पाय
सांगत असते कित्ती काय
भिरभिर नजर इकडे तिकडे
दिसते आईच सगळीकडे
दमते खूप रडते खूप
सुकुन जाते बाळाचे रूप
असेल तिथुन येते आई
पदराखाली झाकून घेई
दूध पिऊन झाल्यावर
खळी पडते गालावर
हसू येतं खुदु खुदु
आई कसली करते जादू?
*
मनुची प्रगती
घटका पळांनी दिसा मासांनी
वाढते राणी राजावाणी
रूपा-गुणाची मोठ्या भाग्याची
लाडकी बाई सार्यांची
कुशिला वळे पालथी लोळे
खेळ सगळे पाहतात
रांगू लागली उभी राहिली
चालू लागली भराभर
लागली बोलू लागली पळू
आई म्हणे हळू धाव बाई
पाहता पाहता होईल मोठी
पोचेल दिठी क्षितिजाशी !!
*
आई झाली लहान
आई जणू झाड तशी
चढते अंगावर
गोरी मऊ उशी करून
झोपते पोटावर
गालगुच्चे घेत म्हणते
खाऊन टाकते तुला
गोड गोड पाप्या घेत
कुशित घेते तिला
आई म्हणते काय चाललंय
गप्प बैस बाई
प्रेम उतू चाललंय म्हणते
शाणी माझी आई
सगळे हसतात खो खो
बोलणं तिचं ऐकून
मनु सुद्धा खिदळू लागते
भलती खुषित येऊन
लाडूबाई लावत असते
आईला लाडी गोडी
तिच्या खेळात आई बनते
लहान तिच्या एवढी!
*
मुक्त बालपण संपत आल्याची चाहूल लागायला लागलीय-
शाळेचा पहिला दिवस
पणजीनं आणली नवी सॅक
बूट आणले बाबानं
आजी आली ड्रेस घेऊन
डबा आणला आईनं
सगळं नवं नवं बघून
मनू खूष झाली
पाठीवरती सॅक लावून
घरभर धावली
भरून झाला डबा केव्हाच
ड्रेस घालून झाला
पहिला दिवस शाळेचा आज
गोंधळ सुरु झाला
वाजत गाजत चालली स्वारी
आईचं बोट धरुन
कळलं नव्हतं अजून तिला
आई जाणार सोडून
शाळा आली अगदी जवळ
गलका ऐकू आला
घट्ट धरला आईचा हात
वेग कमी झाला
आईचं बोट सोडण्याची पण
वेळ जवळ आली
भोकाड पसरून रडत होती
सारी पोरं तिथली
धीर करून आई तिचं
बोट लागली सोडू
टाटा करत निघताना पण
दोघी लागल्या रडू !
*
या कवितेला भोंडल्याच्या गाण्याचा छंद आहे...
शाळेचा दुसरा दिवस
दुसरे दिवशी सुद्धा डबा भरला
उठा उठा मनुताई उशीर झाला
मनुताई काही उठेचना
कुणाशी काही बोलेचना
नको सॅक नको बूट
नको शाळा नको दूध
न ना चा पाढा संपेचना
बाबाची मिठी सोडेना
आजीचंही ऐकेना
आई झाली मग रागीट बाई
खसकन उचलुन कडेवर घेई
आवरुन भरभर शाळेत नेई
रडायचं नाही घाबरायचं नाही
शाळेला दांडी मारायची नाही
शाळेत सोडून आली आई
मागे वळून पाहिलंच नाही!
*
समजावून सांगत, रागावत, दुर्लक्ष करत शाळा चालू झाली... चालूच
राहिली...
सुट्टी नकोच
झाली शाळेची सवय
मग आवडू लागली
मोठे घर अशी शाळा
मनु शाळेत रमली
मित्र मैत्रिणी केवढ्या
मिळतात खेळायला
खूप खेळ आणि खाऊ
पटांगण धावायला
आता रोजच शाळेला
तिला जायचे असते
नको कधी रविवार
सुट्टी नकोच म्हणते
एक दोन तीन चार
वर्षे भराभर गेली
चौथीच्याही अभ्यासात मनु पुढेच
राहिली
बोट आईचे सुटले तिचे
रूप तिचे झाले
हळू हळू तिचे शब्द
तिला भेटाया लागले
*
किशोर वयाची चाहूल लागू लागलीय...
पंख फुटले
भोवतीचे सारे ऐकते
पाहते
डोळ्यांमधे जागे कुतुहल
काय? कसे? का? हे प्रश्न पडतात
सारे थकतात ऐकुनच
पण शिकवून केले तिला धीट
जगण्याची रीत सांगितली
झाली ती शहाणी त्यांना हवी तशी
चाफेकळी जशी चाफ्यासाठी
किशोरीला आता पंखही फुटले
पुरेनासे झाले छोटे घर!
*
आता वयात येऊ लागलेली ही किशोरी स्वतंत्र विचार करायला लागलीय.
तिला आई-बाबांचं वागणं खटकू लागलंय... स्वतःशीच विचार करतेय ती...म्हणतेय-
जमेल ना हे त्यांना
उंच झोका घ्यायला मी घाबरायची
तेव्हा बाबा मी व्हावी धीट
म्हणून जोरात ढकलायचे माझा झोका
माझ्या रडण्याकडे दुर्लक्ष करत
शाळेच्या पहिल्या दिवशी आईनंही
समजावत, रागावत काढलं होतं मला घराबाहेर
बाहेरच्या जगाची ओळख व्हायलाच हवी म्हणून!
हे काय? का? असंच का?
असल्या प्रश्नांना दिली त्यांनी उत्तरं
मला समजतील अशी
पण आता त्यांच्याच इच्छेनुसार
मी धीट झाल्यावर
कसनुसे होतायत बाबा
मी आकाशात झेपावायच्या गोष्टींचा
हट्ट केला की होतायत कावरेबावरे
अंधाराला न घाबरण्याविषयी
समजावणारी आई
अपेक्षा करतेय मनातल्या मनात
की मी परतावी घरी
अंधार व्हायच्या आत
हे काय? का? असंच का?
असल्या प्रश्नांना ते देऊ शकत नाहिएत उत्तरं
माझ्या वाढत्या वयाला पटतील अशी
आणि मला माझ्या नव्या जगाकडून
मिळणारी उत्तरं घाबरवतायत त्यांना
आता मी सांगतेय त्यांना
सतत कानावर पडणार्या
आजच्या इसापनीतीच्या गोष्टी
त्यांनी धीट व्हावं म्हणून
मला माझ्या आकाशात मुक्तपणे
उडू द्यावं म्हणून...
जमेल ना हे त्यांना?
***
आसावरी काकडे
(आकाशवाणी पुणे केंद्रावर बालोद्यान कार्यक्रमात १६.१०.२०११ रोजी प्रसारित) 9421678480 / asavarikakade@gmail.com