प्रिय आई,
तू कितिदा तरी सांगूनही
मी वह्या, पुस्तकं, कपडे
नीट जागेवर ठेवत नाही
पाच-सहा वेळा हाका मारल्याशिवाय
उठत नाही
जेवतो, अभ्यास करतो
जसं काही ते तुझं काम आहे
पण आई, मला माहितीय
असाच मी तुला आवडतो !
तू केव्हा झोपतेस
केव्हा उठतेस
मला कळतही नाही
पण मला माहितीय
की दिवसभर तू कामात असतेस
घरात आणि ऑफिसातही !
मी खेळायला जातो
क्लासला जातो
शाळेला जातो...
वाटतं तुझी नजर मझ्या मागून येतीय...
आई, तुला माहितीय का
की ती नजर
मी माझ्या दप्तरात जपून ठेवतो !
कधी कधी मी घरात असतो
आणि तू असतेस बाहेर
तेव्हा तू घरी येईपर्यंत आई,
तुला माहितीय का
की मी खूप काळजीत असतो
आणि तू आलेली दिसताच
खेळायला पळून जातो
तेव्हा मला एकदम रडू का येतं
तुला माहितीय
का आई ? ***
पूर्वप्रसिद्धी- छात्रप्रबोधन दिवाळी अंक
No comments:
Post a Comment